PBO १.२ औद्योगिक क्रांतीचे परिणाम


Industrial Revoluation


प्रश्न. औद्योगिक क्रांती म्हणजे काय ? औद्योगिक क्रांतीचे परिणाम विशद करा. 

उत्तर : -

प्रस्तावना :  इंग्लंड मध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर संपूर्ण युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियेत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हटल्या जाते. इ.स १७५० ते १८५० असा जवळजवळ एका शतकाचा कालखंड औद्योगिक क्रांतीने व्यापला होता. सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये या क्रांतीला प्रारंभ झाला म्हणूनच इंग्लंड ला ''औद्योगिक क्रांतीची जन्मभूमी'' असे म्हणतात.


इंग्लंडमध्ये उत्साही, धाडसी, कल्पक संशोधकांनी विविध शोध लावले. नवीन यंत्रे तयार केली जसे, जेम्स वॅटने बाष्प यंत्राचा तर जॉर्ज स्टिफनसन ने रेल्वे इंजिनाचा शोध लावला. यांच्या शोधामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला मोठी चालना मिळाली. इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात पसरली. इंग्लंड नंतर फ्रान्स व जर्मनी मध्ये ही क्रांती घडून आली. फ्रान्स व जर्मनी ने लोखंड, पोलाद व रासायनिक उद्योगांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केली व त्यानंतर नेदरलँड, बेल्जियम व स्पेन या देशात सुद्धा औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतरच युरोप बाहेर प्रथम अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली व त्यानंतर आशिया खंडात ही क्रांती सर्वात प्रथम जपान या देशात झाली. जपानने पोलाद यंत्रे व रसायन उद्योगाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक अशी प्रगती केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली. 

आधुनिक रूपात भारताच्या औद्योगिकीकरणाला सन १८५० मध्ये प्रारंभ झाला. सन १८५३-५४  यामध्ये भारतात रेल्वे प्रणाली आणि तार उत्पादनाला सुरुवात झाली. भारतात रेल्वे बनवण्याचा मुख्य उद्देश हा भारतातील कच्च्या मालाची निर्यात तर निर्मित मालाची आयात करणे हा होता. तरीपण रेल्वेमुळे भारतीय उद्योगांना विशेष सहाय्यता मिळाली. सुरुवातीला भारतीय भांडवलातून काही सुत मिल आणि कोळशाच्या खाणी स्थापित करण्यात आल्या. काही कालावधीनंतर भारतात कागद आणि चामड्याचे कारखाने सुरू झाले. सन १९०८ मध्ये भारतात प्रथमच लोखंड आणि पोलाद यांचा कारखाना सुरू झाला. प्रथम महायुद्धानंतर भारतातील उद्योगांच्या विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळाली. द्वितीय महायुद्धाच्या अंतापर्यंत भारताची गणना जगातल्या प्रथम आठ औद्योगिक राष्ट्रात होऊ लागली. भारत साखर, सिमेंट व साबण या क्षेत्रात पूर्णतः आत्मनिर्भर बनला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीला एक नवीन सुरुवात झाली. राष्ट्रीय सरकारने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पंचवार्षिक योजना तयार केली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश देशाच्या औद्योगिक प्रगतीचा स्तर उंचावणे हा होता. औद्योगिक क्रांती करिता कृषि क्रांती, लोकसंख्येचा विस्फोट, व्यापारिक प्रतिबंधची समाप्ती ,पूंजी आणि नवीन तांत्रिकीकरण, कॉलनीज ,राष्ट्रवाद, कारखाना पद्धती ही प्रमुख कारणे ठरली. 

औद्योगिक क्रांतीचे परिणाम: 

अ ) आर्थीक परिणाम :
१) शहरीकरण 
२) बँकिंग आणि मुद्रा प्रणालीचा विकास 
३) मुक्त व्यापार

ब ) सामाजिक परिणाम :
१) लोकसंख्येत वाढ  
२) नवीन सामाजिक वर्गाचा उदय 
३) सांस्कृतिक परिवर्तन

शहरीकरण:  बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातील लघु उद्योगांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. परिणामतः गावातील मजूर कामगार कामाच्या शोधार्थ शहराकडे जाऊ लागले कारण तिथे मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थापन झालेले होते कारण तिथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. स्वाभाविकच शहरीकरणाची प्रक्रिया तीव्र झाली. कोळसा उद्योग तसेच भरपूर पाण्याची उपलब्धता असणाऱ्या औद्योगिक केंद्राच्या आस-पास नवीन शहरे विकसित झाली. 

बँकिंग आणि मुद्रा प्रणालीचा विकास: औद्योगिक क्रांतीनंतर संपूर्ण आर्थिक दृश्यच बदलून गेले. उद्योग आणि व्यापारात बँक आणि मुद्रेची भूमिका महत्त्वपूर्ण झाली. बँकांच्या माध्यमामुळे देण्याघेण्याचे व्यवहार सुलभ झाले चेक आणि ड्राफ्टच्या उपयोगात वाढ झाली. मुद्रेच्या क्षेत्रात सुद्धा विकास झाला. धातू मुद्रेच्या सोबतच कागदी मुद्रा चलनात आल्या. 

मुक्त व्यापार: औद्योगिक क्रांतीमुळे संरक्षण वादाच्या स्थानावर मुक्त व्यापाराच्या नितीचा स्वीकार करण्यात आला. इंग्लंडने व्यापारिक एकाधिकाराला समाप्त करून मुक्त व्यापाराच्या नीतीला पाठिंबा दिला. 

लोकसंख्येत वाढ: औद्योगिक क्रांतीने लोकसंख्या वाढीस चालना दिली. कृषी क्षेत्रात त्रांत्रिक प्रयोगामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन लोकांच्या खाद्यान्नाचा प्रश्न सुटला तर दुसऱ्या बाजूने वाहतुकीच्या आधुनिक साधनांच्या विकासामुळे मागणी असलेल्या क्षेत्रात खाद्यान्नाचा पुरवठा तात्काळ करणे सहज शक्य झाले. चांगले पोषण आणि विकसित स्वास्थ व औषधी विज्ञानातील झालेल्या प्रगतीमुळे नवजात शिशू आणि सरासरी जीवनमानात वाढ होऊन मृत्यू दर कमी झाला व लोकसंख्येत वाढ होत गेली. 

नवीन सामाजिक वर्गाचा उदय : औद्योगिक क्रांतीने नवीन वर्गांना जन्म दिला प्रथम भांडवलशाही वर्ग यामध्ये व्यापारी आणि भांडवलदार सम्मिलित होते. दुसरा मध्यमवर्ग यात कारखान्याची निरीक्षक, दलाल, ठेकेदार, इंजिनियर, वैज्ञानिक हे होते तर तिसरा वर्ग म्हणजे श्रमिक वर्ग जे आपले श्रम आणि कौशल्याने उत्पादनास मदत करीत होते. 

सांस्कृतिक परिवर्तन : औद्योगिक क्रांतीमुळे वर्तमान राहणीमान, वेशभूषा, रीतीरिवाज, कला-साहित्य, मनोरंजनाची साधने यात अमूलाग्र परिवर्तन झाले. परंपरागत शिक्षण पद्धतीच्या जागेवर रोजगार पूरक तांत्रिक प्रबंधकीय शिक्षणाचा विकास झाला. 

अशाप्रकारे औद्योगिक क्रांती व तिचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम स्पष्ट होतात. 

- - - - - -



Comments

Popular posts from this blog

1.3 बहुराष्ट्रीय कंपनी ( Multinational Corporation )

व्यवसाय संघटनेची स्वरूपे ( एकल व्यापार )