व्यवसाय संघटनेची स्वरूपे ( एकल व्यापार )
व्यवसाय संघटनेची स्वरूपे :
(१) एकल व्यापार
(२) भागीदारी
(३) संयुक्त स्कंध प्रमंडळ
(४) सहकारी संस्था
प्रश्न : एकल व्यापार म्हणजे काय ? त्याची वैशिष्टय आणि गुण-दोष विशद करा.
एकल व्यापार : (Sole Trade) :
एकल
व्यापार किंवा व्यक्तिगत व्यापार हे व्यवसाय संघटनेचे
प्रारंभिक स्वरूप होय, व्यवसायाचे एका विशिष्ट पद्धतीने संघटन करण्याची पद्धती इथूनच रूढ झाली. एकल व्यापार पद्धतीत व्यवसाय करण्यासाठी हवे असलेले भांडवल गोळा करणे, व्यवसायाचे संचालन करणे व व्यवसायातील जोखीम स्वीकारणे ही सर्व कार्ये
एकच व्यक्ती करीत असते. अशा व्यक्तीला एकल व्यापारी (Sole Trade) असे म्हणतात व अशा व्यक्तीने
सुरू केलेला व्यापार म्हणजे 'एकल व्यापार' (Sole Trade) होय. व्यवसायाचे संघटन करण्यासाठी जेव्हा एकाच व्यक्तीचे
प्रयत्न व परिश्रम कारणीभूत ठरतात, तेव्हा त्या पद्धतीला एकल व्यापार किंवा व्यक्तिगत
व्यापार असे म्हणतात. ह्या व्यापारात होणाऱ्या नफा किंवा नुकसानीची जबाबदारी त्या एका
व्यक्तीलाच स्वीकारावी लागते. व्यवसाय केव्हाही सुरू करू शकतो किंवा केव्हाही बंद करू
शकतो.
लुईस हुने
यांच्या मते - “ज्या वेळी एकच व्यक्ती व्यवसायाची प्रमुख असून व्यवसायाच्या सर्व कार्यासाठी
जबाबदार असते तसेच व्यवसायाचे व्यवस्थापन करून यशापयशाची जोखीम स्वीकारत असते, अशा
व्यवसायाला एकल व्यापार असे म्हणतात.
सर्वसाधारण
व्याख्या - "एकल व्यापार किंवा व्यक्तिगत
व्यापार हे व्यवसायाचे असे स्वरूप आहे की, ज्याची प्रमुख एकच व्यक्ती असून ती त्या
व्यवसायामधील सर्व क्रियांकरिता जबाबदार असते. आवश्यकता भासल्यास नोकरांची नियुक्ती
करून त्यांची मदत घेते. तसेच तीच व्यक्ती व्यवसायाचे संचालन करते, जोखीम आणि नफा-तोट्याचा
भार स्वत:च उचलते.
एकल व्यापाराची
वैशिष्ट्ये: (Characteristics of Sole Trade):
(१) व्यवसाय सुरू करण्याचे स्वातंत्र्य
(२) अमर्यादित जबाबदारी
(३) मर्यादित कार्यक्षेत्र
(४) एकाच व्यक्तीची संसाधने
(५) आनुवंशिकता आणि वारसाहक्क
(१) व्यवसाय सुरू करण्याचे स्वातंत्र्य : -
भारताचा नागरिक असणाऱ्या कोणत्याही सज्ञान व्यक्तीला या पद्धतीनुसार व्यवसाय सुरु करता येतो त्याला व्यवसाय केव्हाही सुरू करण्याचे तसेच बंद करण्याचे स्वातंत्र्य असते.
(२) अमर्यादित जबाबदारी : -
एकल व्यापार पद्धतीत एकल व्यापाऱ्याची व्यापार प्रति असणारी जबाबदारी असीमित असते. ज्याप्रमाणे व्यवसायाला नफा झाल्यास तो एकटाच त्या नफ्याचा मालक असतो त्याच प्रमाणे व्यापारात हानी झाल्यास ती हानी व्यापारातील देणी भरून देण्याकरिता तो एकटाच जबाबदार असतो. व्यापारातून निर्माण झालेली देणी देण्याकरिता त्याची व्यापारी संपत्ती कमी पडत असेल तर त्याला ती देणी आपल्या खाजगी संपत्तीतून द्यावी लागते.
(३) मर्यादित कार्यक्षेत्र:
अपुरे भांडवल, असीमित जबाबदारी,मर्यादित कार्यक्षमता ह्यामुळे एकल व्यापाराचे कार्यक्षेत्रसुद्धा मर्यादित स्वरूपाचे असते. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे एकल व्यापारी आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकत नाही. त्याचे कार्यक्षेत्र हे नेहमीच मर्यादित असते.
(४) एकाच व्यक्तीची संसाधने :
व्यवसायाचा
कारभार सुरळीत चालण्याकरिता व्यवसायाला अनेक संसाधनांची गरज भासते. जसे : भांडवल, तांत्रिक सल्ला, कार्यक्षमता इत्यादी. एकल व्यापारात व्यवसायासाठी लागणाऱ्या समाधनांची एकाच व्यक्तीला जुळवाजुळव करावी लागते. अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतविण्यात येणारे संपूर्ण भांडवल हे एकाच व्यक्तीचे
असते. तो भांडवलाची उभारणी
स्वत:च्या बचतीमधून किंवा कर्ज घेवून करीत असतो. त्यामुळे भांडवलाचे प्रमाण कमी असते. तसेच व्यापाऱ्याला आवश्यक असणारा तांत्रिक सल्लासुद्धा त्याला तज्ज्ञ व्यक्तीकडून घेणे आर्थिक दृष्टीने परवडत नाही, तर तो स्वत:च तांत्रिक बाबींच्या
बाबतीत विचार करून निर्णय घेत असतो.
(५) आनुवंशिकता आणि वारसाहक्क -
एकल व्यापार हा अनुवंशिकता आणि वारसा हक्क यानुसार चालतो एकल व्यापाऱ्याच्या मृत्यू झाल्यास किंवा तो रद्द झाल्यास त्याच्या व्यवसायाची मालकी वारसाहक्काने त्याच्या मुलांकडे आपोआपच येते म्हणजेच एकल व्यापार हा अनुवंशिकता आणि वारसाहक्क यानुसार चालतो.
Comments
Post a Comment