P.B.O प्रकरण १.१ वाणिज्य आणि उद्योग

उत्तर:
प्रस्तावणा: फार पूर्वीच्या काळी मनुष्य आपल्या गरजा वस्तूंची देवाणघेवाण करून भागवीत असे,आपल्या जवळची अतिरिक्त वस्तू गरजू व्यक्तीला द्यायची व त्याच्या जवळची अतिरिक्त परंतु आपल्या साठी आवश्यक वस्तू आपण घ्यायची व त्या वस्तूचा उपभोग घ्यायचा अशी वस्तुविनिमय क्रिया बऱ्याच कालावधीपर्यंत चालली. सेवासुद्धा वस्तूंच्या बदल्यात घेतल्या जाऊ लागल्या एक प्रकारे आपल्या जवळची वस्तू किंवा सेवा दुसऱ्याला द्यायची व त्याच्या जवळून त्याच्या बदल्यात अन्नधान्य किंवा वस्तू स्वीकारावी असा प्रकार सुरू होता म्हणजेच आपल्या जवळील वस्तू किंवा सेवा दुसर्याला विकायची व त्याच्या ऐवजी त्याचे मूल्य म्हणून अन्नधान्य किंवा इतर वस्तु स्वीकारायची. काही कालावधीनंतर मुद्रा अस्तित्वात आली.मुद्रेच्या उपयोगामुळे तर खरेदी-विक्रीचे व्यवहार सहज सुलभ झाले. यातून खरेदी-विक्रीच्या मार्गे संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि संपादन करण्यासाठी अनेक प्रकारच्या मानवी क्रिया केल्या जाऊ लागल्या. प्रत्येक कार्य हे पैसे कमविण्याच्या उद्देशाने करण्यात येऊ लागले पुढे यालाच "व्यवसाय" असे संबोधण्यात आले.
व्यवसायाचा पहिला भाग म्हणजे उद्योग होय. उद्योग या संकल्पनेत वस्तूचे उत्पादन करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. निसर्गदत्त कच्या वस्तूचे उपभोगक्षम वस्तूत रूपांतर करण्याचे कार्य उद्योगात केले जाते. या वस्तू उत्पादन करण्यासाठी मानवी श्रम उपयोगात आणले जातात. निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू त्याच स्वरूपात वापरता येत नाहीत त्या तशाच वापरल्यास मानवाच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच अशा कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो माल उपभोगक्षम बनविण्याचे कार्य उद्योग या प्रकारात केले जाते.
सर्वसाधारण व्याख्या - "नैसर्गिक कच्या मालावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर मानव उपयोगी वस्तूमध्ये बनविण्याच्या क्रियेला 'उद्योग' असे म्हणतात."
प्रो.राईट (Wright) यांच्या मते - "उद्योग हा समाजाचा त्या आर्थिक क्रियांचा भाग आहे ज्याद्वारे कच्च्या मालाला आर्थिक माल अर्थात मौद्रिक मूल्यावर विक्री करणे योग्य मालाला प्राप्त केल्या जाते यात कृषी आणि निस्सारक उद्योग तसेच निर्माणी आणि रचनात्मक उद्योग सम्मिलित आहे."
उद्योगाची व्याप्ती / प्रकार :

01) प्राथमिक उद्योग - या उद्योग प्रकारात लोकांना खाद्य अन्न उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जाते. तसेच निर्माण उद्योगांना कच्चामाल पुरवण्याचे कार्य केले जाते. उदाहरणार्थ शेती मासेमारी इत्यादी उद्योगांचा समावेश केला जातो.
02) निस्सारक उद्योग - भूगर्भामध्ये असणाऱ्या संपत्तीचे उपभोगक्षम संपत्तीत रूपांतर करण्याच्या उद्योगाला निस्सारक उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ खान,खनिज तेल,नैसर्गिक वायू,सोने,प्लॅटिनम इत्यादी
03) निर्माणी उद्योग - निर्माणी उद्योगांमध्ये कच्च्या मालाचे उपभोगक्षम स्वरूपात परिवर्तन करून त्या वस्तूची उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करणे, यंत्र निर्मिती करणे, साबण उद्योग, कागद उद्योग इत्यादि
04) उत्पत्ती उद्योग - या प्रकारात वनस्पतीची आणि प्राण्यांची निर्मिती केली जाते. यात पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रोपवाटिका इत्यादी उद्योगांचा समावेश केला जातो.
05) रचनात्मक उद्योग - या उद्योगात अनेक वस्तूंच्या एकत्रीकरणाने उपभोगक्षम वस्तूंची निर्मिती केली जाते. यात अनेक निर्मित वस्तू एकत्रित आणल्या जातात आणि त्यांची योग्य प्रकारात जुळवणी करून उपभोगक्षम वस्तूची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ घरबांधणी, जहाजबांधणी, सडकबांधणी, धरण बनवणे इत्यादी.
अशा प्रकारे उद्योगाचा अर्थ स्पष्ट होतो त्यासोबतच उद्योगाची व्याप्ती सुद्धा स्पष्ट होते.
------------------------------------
प्रश्न क्र. ०२) वाणिज्य म्हणजे काय ? वाणिज्याची व्याप्ती स्पष्ट करा.
उत्तर:-
प्रस्तावणा : वाणिज्य म्हणजे व्यवसायाचा दुसरा भाग होय. उद्योग या प्रकारात वस्तूची निर्मिती केली जाते. उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविणे आवश्यक असते कारण त्या वस्तू ग्राहकांसाठी उत्पादित केलेल्या असतात. त्यामुळेच उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश वाणिज्य या संकल्पनेत होत असतो. वाणिज्य या शब्दात अनेक क्रिया संबंधित आहे यामध्ये व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री तसेच व्यापारासाठी सहाय्यक सेवांचा समावेश होतो.
व्याख्या:
स्टीफन्सन यांच्या मते "वाणिज्य हे फक्त खरेदी विक्री आणि मालाची हाताळणी यातच व्यापत नाही, तर वित्त,विमा,संग्रहण आणि वस्तूंचे हस्तांतरण या सर्व क्रिया योग्य वेळी होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सेवा सुद्धा यात व्यापल्या जातात."
सर्वसाधारण व्याख्या : उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रिया म्हणजे वाणिज्य होय.
वाणिज्याची व्याप्ती :

I) व्यापार: व्यापार म्हणजे वस्तूंची व सेवेची खरेदी विक्री करणे होय. उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य व्यापारात केले जाते. कारण उत्पादित वस्तू या ग्राहकांसाठी तयार केल्या जातात म्हणून व्यापाराचे पुढील दोन प्रकार पडतात.
a) देशी व्यापार
b) विदेशी व्यापार
देशी व्यापार : देशांतर्गत होणाऱ्या व्यापाराला देशी व्यापार असे म्हणतात. हा व्यापार देशांच्या सीमेच्या अंतर्गत होत असतो. देशी व्यापाराचे दोन प्रकार पडतात घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करत असतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणात विकत असतो. किरकोळ व्यापारी या वस्तू ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार किरकोळ स्वरूपात विकत असतात.
विदेशी व्यापार : दोन देशांमध्ये होणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असे म्हणतात. कोणताही देश सर्वच वस्तूंच्या बाबतीत परिपूर्ण राहू शकत नाही म्हणून आपल्या देशातील वस्तू ही दुसऱ्या देशात विकावी लागते आणि दुसऱ्या देशातील वस्तू ही आपल्याला विकत घ्यावी लागते. या आधारावर विदेशी व्यापार याचे दोन प्रकार पडले आहे. आयात व्यापार आणि निर्यात व्यापार. आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करणे होय तर निर्यात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशाला वस्तूची विक्री करणे होय.
II) व्यापारास सहाय्यक सेवा : खरेदी-विक्रीचे व्यवहार म्हणजेच व्यापार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक सहाय्यक सेवांची मदत घ्यावी लागते या सेवांनाच व्यापारात सहाय्यक सेवा म्हणतात.
- अधिकोष
- वाहतूक
- विमा
- व्यापारी अभिकर्ते
- संग्रहण
- विक्रय संवर्धन सेवा
Comments
Post a Comment